माझ्या कथा 4.... सोनाबाई
सोनाबाई
सन 1972 मध्ये महाराष्ट्राने फार भयानक दुष्काळ अनुभवला. या दुष्काळात संपूर्ण ग्रामीण जीवन ढवळून निघालं होत. गावातील घरंदाज घराणी सुद्धा मोडून पडली होती. प्रत्येक व्यक्ती आपले सामाजिक स्थान, संस्कार या मर्यादा पाळून जगण्यासाठी धडपड करत होता. दुष्काळी परिस्थितीच्या काळात गावामध्ये होणारे बदल भयावह होते. शेतीवाडी मध्ये कमी उत्पन्न, शेतातील पशुधन सांभाळणे हे तर जिकिरीचे(त्या काळात आज सारख्या चारा छावण्या सुरु झाल्या न्हवत्या) गावकरी स्वतः उपाशी राहत पण मुक्या प्राण्याची काळजी घेत. या परिस्थितीशी तोंड देण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करत होते.
त्या काळात विधानसभेचे सभापती वि. स. पागे यांच्या संकल्पनेतून आलेल्या रोजगार हमी योजनेने ग्रामीण भागातील जनतेला थोडा दिलासा मिळाला होता.गरीब, श्रीमंत सर्वांनाच ही योजना तारक ठरलेली.बरेच जण रोजगार हमी योजनेवर कामावर जात. परंतु काही जण सामाजिक बंधनामुळे अशा कामावर जाऊ शकत नसत. रोजगार हमीच्या कामावर न जाऊ शकणारी
अशीच एक माऊली म्हणजे सोनाबाई.
त्यांचा जगण्याचा संघर्ष मी अतिशय जवळून पाहिला आणि अनुभवला सुद्धा.
सोनाबाईचे साधारण वय पस्तीस ते चाळीस. एका घरंदाज घराण्यातील स्त्री. सडपातळ पाच फूट उंची, छापील सहावारी साडी डोक्यावर पदर मोठं कुंकू काळे सावळे प्रसन्न व्यक्तिमत्व आणि नेहमीच घाईत असणारी. नवरा प्रामाणिक राजकारणी आणि समाजकारणात बुडालेला. पाटीलकीच्या मोठेपणात संसारात कमी आणि गावकीत जास्त रमलेला. घरी तीन लेकरं दुष्काळाने बंद झालेले शेतीचे उत्पन्न अशा अडचणीत सापडलेली सोनाबाई. संसार आणि मुले यांच्या करता प्रामाणिक कष्ट घेणारी एक भारतीय आई.
या सर्वातून बाहेर पडण्याचा मार्ग सोनाबाईनी स्वतःच शोधलेला.सोनाबाई सकाळी मुलांना शाळेत पाठवून, गावातील ज्या स्त्रियांच्याकडे विकण्यास काही असेल ते दही, लोणी, भाजी, कडधान्ये गोळा करत आणि ते सर्व एका बुट्टीत घालून आमच्या वसाहतीत येत तो पर्यंत सकाळचे अकरा वाजलेले असत. सोनाबाई प्रथम आमच्या घरी येत. त्यांना वसाहतीतील कुणी कुणी काय आणण्यास सांगितले आहे ते वेगळे करत आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन विकून येत. कुणाची मुलगी किवा सून बाळंत झाली त्यांना लोणी,तूप , कुणाकडे पाहुणे आले आहेत त्यांना आवडणाऱ्या भाज्या, एखाद्या आजी, आजोबांची खास रानभाजीची आवड असे सर्व वाटत एक वाजता परत आमच्या घरी येत.
आमच्या घराच्या अंगणात एक डेरेदार आंब्याचे झाड होते. त्या झाडाखाली दमून येऊन सोनाबाई बसत. आमचे आंब्याचे झाड वसाहतीत कामास येणाऱ्या स्त्रियांचे विश्रांतीचे ठिकाण होते. आज विचार केला की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. माझी आई हि सर्व अडल्या नाडल्याची आधार होती, अनेकांच्या कौटुंबिक अडचणीचे निराकरण त्याच आंब्याच्या झाडाखाली आईच्या सल्याने होई.या सर्व गोष्टीनी गावातील स्त्रियांना भिडे बाईंचे घर सुरक्षित ठिकाण वाटत होते.
नेहमी येणारया सोनाबाई आमच्या घरच्या सदस्य होऊन आमची सोनामावशी कधी झाली हे आम्हाला कळलेच नाही. तिच्या सर्व गोष्टी लवकर विकून झाल्या असतील आणि काही काम नसेल तर त्या बरेच वेळा माझ्या आई बरोबर आमच्या सर्व पाहुण्यांच्याकडे सांगली मिरज येथे जात आमच्या पाहुण्यात सोनाबाई माहीत नाही असे कोणीच नसेल.
साधारण चार वाजले की सोनामावशींना घरची ओढ लागे आणि उन्हे उतरू लागली की त्या गावाकडे जाण्याच्या तयारीस लागत. जाताना बुट्टीत राहिलेले वाळूक (काकडी), पेरू आपलेपणाने आमच्या हातावर ठेवत, त्या काळात अजून एक पदार्थ खाल्ला तो म्हणजे "सुकडी" . रोजगार हमी योजनेत "सुकडी" हा पदार्थ वाटला जाई तो गहू पीठ साखर या पासून केला असे. सुकडी खाल्ली ती सोनामावशी मुळेच. उद्या कुणास काय आणायचे हे आठवतच त्या मुलांच्या ओढीने गावाकडे चालू लागत.
सोना मावशी ही आज काल असणाऱ्या ऑनलाईन " big basket" app सारखी होती. विकणारा आणि खरेदी करणारा यांच्यातील दुवा. गावातील ज्यांच्या कडे आहे त्यांच्या कडून घ्यायचे आणि वसाहतीत ज्यांना गरज आहे त्यांना द्यायचे. आणि सर्वांचीच गरज भागवयाची. यातून दुष्काळात सुद्धा ग्रामीण अर्थचक्र चालत होते.
त्यांनी मुलांना शिकवले ती मोठी झाली आणि त्यांनी आईच्या कष्टाचे पांग फेडून सोनामावशीस आनंदात ठेवले. परंतु सोनामावशी सतत माणसात राहण्याची सवय झाली होती. तिला वसाहतीत यावे असे वाटे मुलांनी आईचे कष्ट पाहिलेले असल्याने ते तिला तिचा big basket चा व्यवसाय करू देत न्हवते. त्यामुळे सोना मावशीचे आमच्या घरी येणे कमी होत गेले. आठवण आली की घरी येत आई बरोबर जुन्या आठवणीची शिदोरी सोडून आंब्याच्या झाडाखाली बसत. त्या आंब्याच्या झाडाने आणि माझ्या आईने किती जणांची सुखदुःखे ऐकली असतील.
आज सोना मावशी या जगात नाहीत पण त्यांनी दुष्काळात फुलवलेला नात्यांचा मळा आज ही हिरवागार आहे.
श्री. जयराम भिडे
9/2/21
Comments
Post a Comment