नाका

 *नाका*


            सकाळी सहजपणे लाँग ड्राईव्हला  बाहेर पडलो ते माझ्या आवडत्या रस्त्यावर.घराला लागून असणारा तुळजापूर महामार्ग जो अतिशय चांगला झाला आहे.अशा सुंदर रस्त्यावरून गाडी चालवणे खूपच आनंददायक.  पावसामुळे महामार्गाच्या दुतर्फा दिसणारी हिरवाई आणि डाव्या बाजूला  असणारे हिप्परगा जलाशयाचे  पाणी,हे सर्व वातावरण मनात जोश निर्माण करत होते. या जोशात गाडी चालवत असताना  स्पीडोमीटरने 100 चा  आकडा कधी गाठला ते कळलेच नाही. जवळ बसलेल्या सौ. ने वाढलेला वेग हळूच नजरेने सांगण्याचा प्रयत्न केला.  तिच्या इशाऱ्या कडे सोईस्करपणे दुर्लक्ष करत  गाडी चालवत होतो.  वेगात जात असताना समोर उंचावर एक बोर्ड दिसला,टोल नाका" 500 मीटर ". बोर्ड दिसताच गाडीचा वेग कमी करत नक्याचा जवळ आलो . तेथील फास्टॅग रीडरने  फास्टॅगचे वाचन केले आणि पुढील स्वयंचलित  आडवा बार बाजूस झाला . गाडी टोल नाका ओलांडून पुढे निघाली. 

                     मनात विचार आला सौ. नजरेने स्पीड कमी करा सांगत असताना त्याकडे दुर्लक्ष करून मी निघालो होतो पण नाका येताच वेगावर नियंत्रण आले. खरंच माणसाच्या प्रत्येक कृतीवर नियंत्रण खूप जरुरीचे आहे याची जाणीव झाली.


                         लाँग ड्राईव्ह वरून परत आलो ,परंतु नाका काही केल्या मनातून जात न्हवता. नाका म्हणजे काय ? माझ्यातील शिक्षक जागा झाला आणि त्याने व्याख्या सांगितली.

"नाका म्हणजे गावाची किंवा रस्त्यावरील अशी जागा जेथून  येणारी जाणारी माणसे दिसतात. जी कळत न कळत येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीच्या कृतिवर सामाजिक बांधिलकीतून  नियंत्रण ठेवत असतात."


                  रस्ता असो की  जीवनाचा प्रवास  नियंत्रित करण्यासाठी नाके हवेतच त्यावरील टोल द्यावा लागला तरी चालेल. मानवी जीवनाचा प्रवास डोळ्या पुढून सरकू लागला.  लहानपणापासून आपल्या मनावर आणि वर्तणूकीवर नियंत्रण करणारे नाके म्हणजे आई ,वडील ,आजी ,आजोबा.


                          चारचौघात कसे वागावे, शिक्षणाचा प्रवास आणि अनेक गोष्टी कळत न कळत आई वडिलांनी मनावर बिंबवल्या ते फक्त प्रेमाचा टोल देवून.

      मन पटलावर एका गाण्याच्या ओळी उमठल्या 


"  तरुणपणाच्या रस्त्यावरचं पहिलं ठिकाण नाक्याचं

अन् सोळावं वरीस धोक्याचं ग सोळावं वरीस धोक्याचं"

                 

                 कवी श्री जगदीश खबूडकर यांचे अर्थपूर्ण शब्द आणि सुलोचना चव्हाण यांचा लावणी प्रकारास चपखल असणारा आवाज यातून अजरामर झालेले गीत आज ही तारुण्याचा उंबरठा ओलांडताना येणारे धोके सांगत आहे. तारुण्यातील प्रयेक पाऊल  जपून  टाकण्याची आणि हे धोके ओळखण्याची शिकवणं आणि संस्कार देणारी  फक्त आई . त्याच प्रमाणे आदर युक्त भीतीचा नाका म्हणजे वडील. वेळ प्रसंगी वाईटपणा घेऊन जीवनास शिस्त लावणारे वडील असतात.

            गुरु हा जीवनाच्या  खडतर प्रवासात योग्य मार्गदर्शन करून कधीच आपली गाडी ट्रॅक चुकू नये याची काळजी घेतो  म्हणून आपल्या संस्कृतीत गुरुचे स्थान महत्त्वाचे आहे.

                       जीवनात अनेक प्रसंग येत असतात आनंदाच्या प्रसंगात जरा वाटेवरून भटकवणारा आणि अडचण येताना खात्री  ने आपल्या बरोबरीने येऊन ती  अडचणीची  वाट  संपे पर्यंत हात न सोडणारा फक्त आणि फक्त मित्र असतो.


         सहचारिणीचे जीवनातील स्थान आई इतकेच महत्त्वाचे. काही वेळा आईस मुलांच्या वरील प्रेमाने चुका दिसत नाहीत.  परंतु पत्नी त्याच चुका नुसत्या नजरेतून दाखवून देते. आधुनिक भाषेत पत्नी म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा असतो आवाजाच्या additional features सह. काय मंडळी पटतंय ना?


                   तर असा हा जीवनाचा प्रवास शेवटी विश्रांती नाक्यावर येऊन थांबतो. माणसाचा प्रवास  ज्ञाताकडून   अज्ञाता कडे सुरू होतो.


   जीवनाच्या प्रवासात लगती अनेक नाके


पहिला  नाका आईचा, मिळे ठेवा संस्काराचा


दुसऱ्यां नाका वडिलांचा,  देई पाठ कर्तव्याचा


तिसरा नाका गुरूचा, सांगे अर्थ जीवनाचा.


चौथा नाका  मैत्रीचा, सुखदुःखात हात हाती खात्रीचा.


पाचवा नाका पत्नीचा, नजरेतूनीअर्थ सांगे सप्तपदीचा.


शेवटचा नाका "विश्रांतीचा" मार्ग दाखवे

वैकुंठचा.


       श्री जयराम भिडे

        21/12/21

Comments