पराधीन आहे जगती
पराधीन आहे जगती ......
करोना आणि मृत्यू हे आज कालच समीकरणच होत चालले आहे. आज सकाळी एका स्वामींची निधन वार्ता आली.त्यावर चर्चा चालू असतानाच एक काकू सहज बोलून गेल्या स्वामी असून असा मृत्यू का? या वाक्याने विचारचक्र सुरू झाले आणि सहजपणे एका गाण्याचे शब्द आठवले.....
"पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा"
गीत रामायण मधील या गीतात ग. दी. मा. नी किती उत्कट आणि अर्थपूर्ण शब्दात रामायणातील श्रीराम आणि भरत या दोन बंधूतील सवांद दहा कडव्यात शब्दबध्द केला आहे. तो काव्यमय प्रवास फक्त त्यांच्या पुरता न राहता समस्त मानव जातीस लागू होतो आणि मानवी जन्माचा पटच उलगडत जातो. सामान्य माणूस असो, संत असो की देवाचा मानवी अवतार एकदा माणूस म्हणून जन्म घेतला की कर्मामुळे मिळणारी फळे भोगाविच लागतात.
कर्मसिध्दांत हा आपल्या संस्कृतीमधील एक महत्त्वपूर्ण विचार आहे. क्रियमान, संचित आणि प्रारब्ध असे कर्माचे तीन प्रकार पडतात. वर्तमानात जे केले जाते, ते क्रियमान कर्म. त्याचे फळ तत्काळ मिळते. ज्या कर्माचे फळ कालांतराने मिळते, ते संचित कर्म. योग्य वेळी व संधी मिळाल्यावर जेव्हा संचित कर्म फळ देते, तेव्हा त्यास प्रारब्ध कर्म म्हणतात. या तिन्ही कर्मांच्या संयोगाने मानव जीवन नियंत्रित होत असते. प्रारब्ध हा शब्दच गूढ आहे. त्यामुळे आपल्या पुढे काय वाढून ठेवले आहे मानवी मनास उमजत नाही.
मनुष्य अवतारात असणाऱ्या देवाना सुद्धा कर्मफळे आणि मृत्यू टाळता आला नाही. तो कृष्ण, राम किव्हा येसू असो.
श्री समर्थ दासबोधात *मृत्यू निरूपण* या भागात सांगतात. मानवी जीवनाचा प्रवाह
कालचक्राने नियंत्रित केला असून तो मृत्यूच्या दिशेने चालला आहे, हे आपण पाहतो. पूर्वसंचित संपले की, क्षणभरही न थांबता हा देह सोडून जावे लागते.
"सरतां संचिताचें शेष । नाही क्षणाचा अवकाश ।
भरतां न भरतां निमिष्य । जाणे लागे ॥
पराधीन आहे जगती याच गाण्यातील
"जिवासवें जन्मे मृत्यू, जोड जन्मजात
दिसे भासतें तें सारें विश्व नाशवंत"
जन्म व मृत्यू ही जन्मजात जोडी असून दिसे भासे ते सारे नाशवंत’ हे सत्य, दोन ओळी जीवन मरणाचं तत्वज्ञान सहज पणे सांगून जातात.
म्हणून जन्म, मृत्यू यांच्या मध्ये कर्म आणि प्रारब्ध हे असते. या जीवन काळात जे आपण अनुभवतो ते भोग.
*भोग भोगताना जे आनंदी दुःखी कष्टी होतो तो मानव*
*भोग भोगताना स्वतःस आणि दुसऱ्यास आनंदी करून ही जीवनयात्रा संपवतात ते संत*
* स्वतः सर्व सहन करून संपूर्ण समाजास आनंदी करून आपले जीवन संपावतात ते अवतार*
यातून येवढेच म्हणावे वाटते मृत्यू प्रत्येकास येणारच तो कोणी असो..रामदास स्वामींनी म्हणून ठेवले आहे.
मृत्यू न म्हणे हा संत ।
मृत्यू न म्हणे हा महंत ।
मृत्यू न म्हणे हा गुप्त ।
होत असे ।।
।। जय जय रघुवीर समर्थ ।।
श्री. जयराम भिडे
30/4/21
Comments
Post a Comment