माझ्या कथा 1..मास्क मुखवटा, माणूस
मास्क. मुखवटा आणि माणूस
बरेच दिवसांनी आज पहाटे कॉलनीच्या बाहेर फिरण्यास निघालो. नेहमी प्रमाणे पुणे हाइवे जवळील सर्व्हिस रोड वर फिरत असताना ओळखीचे चेहरे दिसतात का ते निरखून पाहू लागलो. किती प्रयत्न केले तरी चेहरे ओळखीचेच वाटेनात. अनेक व्यक्तीची तोंडे मास्कने झाकलेली दिसत होती. प्रत्येकाचे डोळे एकमेकाकडे प्रश्नार्थक नजरेने पाहात ओळख शोधण्याचा प्रयत्न करत होते.
असाच चालत असताना मनामध्ये अनेक विचारांची गर्दी होऊ लागली आणि पाहिलेल्या मास्कची रूपे डोळ्यापुढे सरकू लागली. आमच्या गावात जैन साध्वी, मुनी येत त्यांच्या तोंडावर पांढरी मुखपट्टी असे ती सभ्यता, संस्कृती आणि बंधने याचे प्रतीक होते. दवाखान्यातील डॉक्टर,नर्सेस, वॉर्ड बॉय यांच्या चेहऱ्यावरील हिरव्या रंगाचा मास्क, सुरक्षा आणि कर्तव्याची जाणिव करुन देतो. विज्ञान प्रयोगशाळेतील N 95 मास्क शास्त्रज्ञांच आणि प्रयोगाच्या संरक्षणाचे काम करतो. बुरखा धार्मिकतेच्या नावाखाली स्त्रियांच्यावर लादलेली बंधने अधोरेखित करतो.
आज काल तरुण मुलींच्यात पॉप्युलर असणारा मास्क प्रकार म्हणजे स्टोल.हा उन , वारा यापासून संरक्षण करतोच आणि वाईट नजरा पासून बचाव पण करतो. स्टोल हा सामाजिक संस्कारांच्या अपयशाचे प्रतीक झाला आहे. स्टोल, बुरखा न घालता स्त्रिया फिरू शकतील तो दिवस आपण सुसंस्कृत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पाईक आहोत हे सिद्ध करेल.
माणसाची बाह्य ओळख ही चेहरा, हास्य आणि आवाजाने होते. मास्कने चेहरा आणि त्यावरील भाव झाकले जाऊ लागले आणि समोरील चेहरे अनोळखी होत चालले. आता बाह्यरूप ओळखण्याकरिता नवीन कला आत्मसात करावी लागेल. त्या करिता मार्ग राहतो तो डोळ्यांचा. डोळे वाचणे शिकावे लागेल. डोळे आणि ओळख याचा सुंदर उपयोग आपल्या चित्रपट सृष्टीने केला आहे. आज ही फार पूर्वी पाहिलेला दो अँखे बारा हाथ हा चित्र महर्षी व्ही शांताराम यांचा चित्रपट आठवतो. जेलरच्या डोळ्यातील धाक आणि प्रेम या भावनांनी वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो हे सहा कैदयांच्या मदतीने खूप छान चित्रित केले आहे. तरुणपणी पाहिलेला ऋषिकपूर आणि रंजिता अभिनीत लैला मजनू या सिनेमात रंजिताच्या बुरख्यातून दिसणाऱ्या डोळ्याना पाहून मजनू प्रेमात पडतो. आणि फक्त डोळयांच्या आधारे तिला हुडकत राहतो. पूर्ण चित्रपटात नुसत्या डोळ्यातील अभिनयाने तिने भूमिका जिवंत केली आहे. आणी एवढच काय माझ्या लग्ना नंतर माझी आई मला नेहमीच म्हणायची' बायकोच्या डोळ्यांकडे बघून बोलतो." आणि ती सवय आज 32 वर्षे टिकून आहे.( सुखी संसाराचा मूलमंत्र)
याच विचारात वॉकिंग चालू होते, तेवढ्यात का बे दिसला नाहीस बरेच दिवसात. याओळखीच्या आवाजाने विचाराची तंद्री भंगली आणि पाहतो तर मित्र मास्कसहित समोर उभा. त्याला ओळखले ते त्याच्याआवाजानेच.त्यामुळे ओळखी करिता आवाजाचे महत्त्व अधोरेखित झाले. आणि त्या अनोळखी वाटणाऱ्या गर्दीत ओळखीच्या आवाजाने चेहऱ्यावर हास्य फुलले जे मास्क मध्येच हरवले. भारतरत्न लता, आशा, महमद रफी, किशोर यांना आपण कधीच भेटलो नाही पण त्यांची ओळख आहे ती फक्त आणि फक्त आवाजाने. बिनाका गीतमाला अमीन सयानींच्या आवाजाने अजरामर झाली आहे.
मास्कचा विचार मास्क सारखाच मनाला चिकटला होता.त्याच विचारात डोळ्यापुढे असंख्य रंगाचे, आकाराचे मुखवटे नाच करू लागले. मुखवटे हे अनादिकाला पासून मानवी सामाजिक संस्कृतीचे प्रतीक राहिले आहेत. आदिवासी समाजात भूत प्रेत आणि अनामिक शक्ती या बद्दल असणाऱ्या भीती पोटी मुखवटे नृत्य केली जातात. मुखवटे बांबूला लावून नाचण्याची प्रथा आहे. पुढे मानवाच्या सामाजिक उत्क्रांतीत याचे रूपांतर विविध कला प्रकारात झाले. शरीरावर रंगवणे, चेहरे रंगवणे अश्या कला आणि नृत्य प्रकार अस्तित्वात आले. गौरीचे मुखवटे तयार करणे ही कला आहे.
दुपार झाली तरी मास्क , मुखवटा हा विचार विक्रम वेताळ कथेतील वेताळासारखा माझ्या मानगुटीवर बसला होता. आणि मला विविध प्रश्न विचारत होता. मनात मुखवटे घेऊन फिरणारे समाजातील चेहरे दिसू लागले आणि आपोआप अनुभवाची पाने पलटू लागली.
अनावश्यक गोड बोलणारी, वारंवार पाया पडणारी माणसे नेहमीच चेहऱ्यावर एक आणि मनात एक भाव घेऊन समाजात वावरत असतात. मुखवटे तर राजकारणाचे प्रतीक. महाभारता पासून राजकारणातील हेवेदावे, स्वार्थ आणि त्याचे होणारे प्रदर्शन आपण वाचले आहे. मला नेहमीच वाटते गांधारीने त्या काळातील राजकारणाची रूपे पाहण्यापेक्षा स्वतःच्या डोळ्यांवर पट्टी बांधून स्वतःला अलिप्त केले असेल. सध्याच्या राजकारण्यांचे बदलणारे रंग पाहून त्यांना चिन्ह म्हणून लाल, पिवळा, निळा रंगाचे मुखवटे द्यावेत त्या मुळे रंग आणि पक्ष बद्दलणे सोपे जाईल. हे राजकीय मुखवटे पाहून मनात दाग सिनेमातील गाण्याचे शब्द आले.
*जब भी जी चाहे, नई दुनिया बसा लेते हैं लोग
एक चेहरे पे कई चेहरे, लगा लेते हैं लोग* आजच्या राजकरण्याच्या बद्दल किती चपखल शब्द
. या सगळ्या विचारांनी नैराश्य येत चालेले होते. त्याच मूड मध्ये संध्याकाळी येत असताना घराजवळ शेजारची लहान मुलगी नटून थटून आणि कपड्याचाच रंगाचा मास्क लावून समोर आली. मी नेहमीप्रमाणे तिची चेष्टा करत विचारले कुठ चालली नकटी?( नकटी म्हणलेले तिला फारसे आवडत नाही.) तिने मास्क खाली केला आणि नाक मुरडून लटक्या रागांत म्हणाली फ्रेण्ड्सच्या बर्थडेला आणि उड्या मारत निघून गेली.तिच्या चेहऱ्या वरील निरागस भाव पाहून माझ्या डोक्यातील मास्कचा वेताळ पळाला.
समाजातील मास्क , मुखवटे जातील राहतील ते काळच ठरवेल. एक मात्र नक्की विधात्याने तयार केलेला मानवी मुखवटा म्हणजे चेहरा. हा चेहेरा कधी ना कधी लादलेल्या किंवा ओढलेल्या मुखवट्यातून बाहेर येईल आणि आपलेपणा, प्रेम, निरागसता या रंगात रंगून जाईल.
श्री. जयराम भिडे. M. Sc. B.Ed
उप प्राचार्य
दयानंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर
29/8/20
8668612752
Comments
Post a Comment