माझ्या कथा.. स्टँड/ थांबा
स्टँड/ थांबा
अचानक काही आठवणी, शब्द, गाणी, प्रसंग आपल्या मनात येतात, तेथेच रेंगाळतात आणि दिवसभर आपल्या भवती पिंगा घालत राहतात. आज दुपारी कॉलेजवरून येत असताना मागून कोणीतरी ओ सर, ओ सर , थाबा की. अशी हाक मारत असल्याचा जाणवले. मागे वळून बघत असता एक मुलगी हाक मारत होती तिला पाहून थांबलो. ती बारावी पास आऊट विद्यार्थिनी होती, भरभर चालतच जवळ आली आणि तिला बारावी नंतर मिळालेल्या कॉलेज प्रवेशाबद्दल आनंदने सांगत होती. तिच्याशी गप्पा मारत तिचे अभिनंदन करून घरी आलो.
घरी आल्यावर चहा पीत गप्पा मारत असताना गप्पापेक्षा विद्यार्थिनी आणि तिने मारलेल्या हाकेतील थांबा शब्द माझ्या मनात होता. व्याकरणाच्या दृष्टीने थांबा शब्द नाम म्हणून वापरला जातो जसे बस थांबा( स्टॅण्ड) तर कधी क्रियापद, मित्रा थांब. ते व्याकरणाच्या दृष्टीने काही असेल पण माझ्या मनात हा शब्द आणि त्या विषयीच्या भावना खूप वेगळ्याच आहेत.
थांबा( क्रियापद) शब्द कानावर पडताच लगेचच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करतो. ती व्यक्ती का हाक मारत असेल? काय काम असेल? काय ब्याद तर मागे लागणार नाही ना? असे एक का अनेक प्रश्न निर्माण करते. तेवढेच नाही थांबा या शब्दाचा अर्थ स्थळ ,काळ, वेळ या नुसार वेगळा असू शकतो. रात्रीचे आपण आड वाटेने निघालो असू आणि अंधारातून आवाज आला " साहेब थांबा मी येतो तुमच्या बरोबर" या प्रसंगात आपली अवस्था काय होईल वेगळे सांगण्याची गरजच नाही.
रवींद्र महाजनी आणि रंजना यांच्यावर चित्रित झालेले झुंज या चित्रपटातील निसर्ग राजा ऐक सांगतो..... हे सुंदर प्रेम गीत आहे..
जरा थांबा ना...
का
वा छान दिसतंय...
काय
हे रूप भिजलेलं.....
त्यातील "जरा थांबा ना" हे नायकाच्या ओठीचे प्रेमळ अर्जवीचे शब्द कायमचे मनावर कोरलेले आहेत.
अशी "थांबा" ही हाक आणि ती हाक मारताना आवाजातील, चेहऱ्यावरील बदल आपणास खूप काही सांगून जातात.
अे ....थांब.......दरारा
थांबतो का बे...... मैत्री
थांब प्लीज..... विनंती
अहो थांबाना.......रोमँटिक मूड
अशी कितीतरी वाक्ये आपल्या प्रत्येकाच्या मनात असतील. या प्रकारच्या वाक्यात जरी थांबा शब्द असलातरी त्यात संवाद जास्त आहे.
दुसरा एक थांबा( नाम) आहे. शहरातील बस थांबा, एस टी स्टँड, रेल्वे स्टेशन हे गाडी किंवा कुणाची तरी वाट पाहत थांबण्याचे ठिकाण. या थांब्यात गर्दीतील एकटेपण आहे, अबोला आहे, हुरहूर आहे, चिंता आहे , आनंद आहे. हे सर्व भाव व्यक्तीच्या मनात प्रसंगानुसार येत असतात. प्रत्येक स्थानकावरती असणारी माणसे गर्दीत सुद्धा भावनांच्या कलोहलात हरवलेली असतात. माणसाचे चेहऱ्यावरील भाव पाहणे हा तर माझा आवडता छंद आहे. त्यातील अनेक आठवणी कायमच्या मनात आहेत...... पहिल्यांदाच सासरहून येणारी माहेरवाशीण आणि तिची वाट पाहत स्टॉप वरती उभा असणारा तिचा बाप, भाऊ यांचा चेहऱ्यावरील आतुरता, आनंद त्याच बरोबर हळूच दिसणारी काळजी.....
स्टँडवर पंढरीला जाण्याकरिता एसटीची वाट पाहत उभारलेला वारकरी....... प्रेयसीच्या प्रतीक्षेतील प्रियकर.... अशा अनेक भावनांचा आविष्कार याच थांब्यावर पाहण्यास मिळतो. आजच्या शहरी फ्लॅट संस्कृतीत एक नवा थांबा तयार झाला आहे तो म्हणजे खिडकी. घरातील वरिष्ठ, लहान मुले, कंटाळलेली गृहिणी सर्व जण इथेच तर थांबतात. संध्याकाळी खिडकीत बसून आई वडील येण्याची आतुरतेने वाट पाहणारी लहान मुले लांबूनच येता येता खिडकीकडे पाहणारी आई त्यांची नजरानजर होताच त्यांच्या चेहरावर दिसणारा आनंद हे जिवंत चित्र डोळ्यांनी टिपण्यासारखे असते.
दैनंदिन जीवनात थांबा म्हणजे मर्यादा. नातीगोती योग्य प्रकारे निभवायची असतील तर प्रत्येकास कुठे थांबायचे हे कळले तरच नाती टिकतात आणि फुलतात सुद्धा. जेव्हा नात्यातील लक्ष्मण रेषा ओलांडतो तेव्हाच रामायण काय महाभारत सुद्धा घडते. या नात्यातील मर्यादांनाच आजच्या काळात स्पेस म्हणत असतील. रोजच्या धावपळीत बाहेर जात असताना रस्त्यावरील सिग्नल आपणास ह्याच मर्यादा विविध रंगांनी दाखवत असतो. लाल रंगाची मर्यादा ओलांडली की अपघात हा झालाच.
माणूस ऐहिक जीवनातील शेवटच्या प्रवासास निघतो तेव्हा प्रत्येक गावात वैकुंठ धामाच्या वाटेवर एक थांबा असतो त्यास विश्रांती ठिकाण असे म्हणतात. तिथे माणसाची शेवटची यात्रा काहीकाळ थांबते. तोच या मानवी जीवनातील शेवटचा थांबा. तेथून सुरू होतो तो एक वेगळा प्रवास. स्थुलाकडून सूक्ष्माकडे,आत्म्याकडून परमात्माकडे, कायमच्या विसाव्या करिता.
अप्रतिम सर जी🙏
ReplyDelete🌷
Delete👌👌
ReplyDeleteछान लिखाण आहे. लिहित चला सर .धन्यवाद
ReplyDelete