मुस्कान
मुस्कान
दुपारी चारची वेळ. पुण्यातून एक मंगल कार्य आटपून रेल्वेने येण्याकरता पुणे स्टेशनकडे निघालो. सवयी प्रमाणे गाडीच्या वेळे आधी स्टेशन वर पोहचलो. पुणे स्टेशन माणसांनी गजबजून गेले होते. काकीनाडा एक्स्प्रेसच्या आरक्षित बोगीत येऊन बसलो. कधी न्हवे ते हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजाला अनुसरून हवेत प्रचंड उकाडा जाणवत होता.
उकाड्याने हैराण झाल्याने कंपार्टमेंट मध्ये कोणीच कोणाशी बोलत न्हवते. खिडकीतून येणारा वारा गरमच होता पण तो सुद्धा उकाड्यात बरा वाटत होता. वारा आणि गाडीचा येणारा विशिष्ठ आवाज यामुळे हळू हळू बरेच जण पेंगू लागले. मला प्रवासात झोपण्याची सवय नसल्याने पेपर काढून वाचू लागलो. युक्रेन, हिजाब, सोमय्या आणि राऊत हे विषय सोडून काहीच न्हवते. पेपर मिटला व माझा आवडता छंद सुरू झाला माणसे वाचण्याचा.
कंपार्टमेंट मध्ये आम्ही उभयता धरून दहा जण होतो. दोन तरुण मुले, एक तीस पस्तीस वर्षाचे जोडपे व एकाच परिवारातील चार स्त्रिया विविध वयोगटातल्या. समोर असणारी तरुण मुलगी व मुलगा जागे होते. ते आजच्या पिढीचे प्रतिनिधी असल्याने त्यांनी गाडीत बसताच हेड फोन लावून आपल्याच विश्वात मग्न झाले होते. जोडप्यातील पुरुष उकाड्याने हैराण झाल्याने उठून दरवाजात उभा राहण्यास गेला. सहज पत्नीकडे पाहिले तर ती केव्हाच झोपी गेली होती.
माझे राहून राहून लक्ष जात होते ते त्या चार स्त्रियांकडे. एक नव्वदीतील दादीजी. ज्यांच्या डोक्यावर पदर होता. दुसरी दादिजींची सून (बडी मा) तीने चेहऱ्यावर फक्त हिजाब घेतला होता.
तिसरी तीस एक वयाची आई आणि शेवटची फक्त पाच ते सहा वर्षाची मुलगी. त्या दोघींनी पूर्ण बुरखा घेतलेला होता. डब्यात असणारा उकाडा आणि अंगभर असणारा बुरख्यांमुळे ती लहान मुलगी रडू लागली. तिच्या रडण्याने आईच्या मनाची घालमेल सुरू होती आणि ती तिच्या चेहऱ्यावर ठळक पणे दिसत होती..
सर्वत्र पसरलेली अबोल शांतता त्या मुलीच्या रडण्याने भंग पावली. पेपर मधील बातम्या आणि मुलीचे रडणे या सर्व गोष्टी मला अस्वस्थ करत होत्या. परंपरेच्या नावाखाली लहान मुलाचे जगणे सुद्धा सोपे होऊ नये? याच विचारात असताना गाडीने दौंड स्टेशन मध्ये प्रवेश केला.
चहा, वडापाव विकणाऱ्यांच्या आवाजाने सर्व जण जागे झाले होते. आता डब्यातील हालचाल वाढली. त्या आईने सासूकडे नजर टाकली एका आईच्या नजरेची भाषा दुसऱ्या आईला समजली. सासूने मान हलवली की त्या आईने छोट्या मुलीचा बुरखा काढला. स्वतःच्या चेहऱ्यावरील काळे कापड काढून मुलीला पटकन जवळ घेत तिचे पापे घेऊ लागली.
एक पडदा नाहीसा झाला होता व दोघींच्या चेहेऱ्या वरील हास्य सोहळा पाहण्या सारखा होता. त्या हास्यानी डब्यातील उदासीनता एका क्षणात नाहीशी झाली. दुसऱ्या जोडप्यातील स्त्री आता तिच्याच वयाच्या आईशी बोलू लागली "बडी प्यारी बेटी है" त्या एका वाक्याने दोन आई मधील संवाद सुरू झाला. दोघींचे मराठी आणि खास सोलापूर मधील विजापूर वेस हिंदी संभाषण अजून मानवी नात्यातील खुमारी वाढवत होते. आजच्या सोशल मीडियाने तयार केलेला दोन धर्मातील पडदा मातांच्या संवादाने केव्हाच गळून पडला होता.
आता सूर्य मावळतीला आला होता. उन्हाचा तडाखा कमी झाल्याने खिडकीतून गार वारे येत होते. हवेतील गारवा आणि डब्यातील हास्य सर्वांची मने प्रफुल्लित करत होती. आता सामुदायिक संवाद सुरू झाला.त्यातून त्या चार स्त्रियांचे आपापसातील नाते कळले होते. सहज मनात आले पणजीस मिळालेले स्वातंत्र्य त्या लहान मुलीस का नाही?
याच विचारात असताना माझ्या व्यवसायातील एक अनुभव आठवला.दोन वर्षापूर्वी 11 वी प्रवेशासाठी सोलापूरच्या ग्रामीण भागातून वडील व मुलगी आले होते. त्या पालकांचा गावाकडे छोटा व्यवसाय होता. ते आपल्या मुलीला खूप शिकवू इच्छित होते. त्यांनी माझी गाठ घेऊन मुलीकडे लक्ष द्या असे सांगितले. एक पंधरा सोळा वर्षांची मुलगी प्रथमच घर सोडून शहरात शिकण्यास आली होती. मी तिला तिचे नाव विचारले. तीने निरागस पणे सांगितले "मुस्कान" आज ही तो निरागस चेहरा आणि नाव आठवतेच पण मुलीच्या शिक्षणाकरिता आर्थिक सामाजिक बंधने झुगारून धडपडणारा बाप जास्त लक्षात राहतो.
मुलीच्या शिक्षणा करता पडदा सारणारा बाप असेल , नाती करता पडदा काढण्यास परवानगी देणारी आजी असेल आणि भिन्न धर्माचे पडदे सारून फक्त मातृत्वाचा उत्सव करणाऱ्या त्या दोन माता असतील ते पाहून मन प्रफु्लित झाले.
नक्कीच एक दिवस मानवाने घेतलेले मुखवटे असोत वा सीमा, रंग , धर्म, आर्थिक असे लादलेले सर्व पडदे असोत. एक दिवस गळून पडतील आणि प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसेल ते स्वच्छ मनाचे प्रतिबिंब "मुस्कान"
याच प्रसन्न मूड मध्ये सोलापूर स्टेशन वरती उतरलो आणि जिना चढत असताना एक सुंदर प्रार्थना गीत आठवले.
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे
...............
"धर्म, जाती, प्रांत, भाषा, द्वेष सारे संपू दे
एक निष्ठा, एक आशा, एक रंगी रंगू दे
अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे."
श्री जयराम भिडे
25/03/22
.PC.... Google
खूप सुंदर
ReplyDeleteखूप सुंदर वर्णन आहे. असेच लिहित रहा.
ReplyDeleteमस्त
ReplyDelete