धुंदी कळ्यांना

 धुंदी कळ्यांना धुंदी फुलांना.

          

श्री जयराम भिडे


ऋतू कोणता ही असो पहाटेचे फिरणे मी शक्यतो चुकवत नाही.  असाच एक दिवस वाढलेल्या थंडीत फिरण्यास निघालो होतो. नेहमी फिरण्यास येणारा मित्र परिवार आता कमी झाला होता. त्यामुळे एकटाच फिरण्याचा आनंद घेत निघालो.     


                वातावरणात सगळीकडे एक निरव शांतता होती. या शांततेत झाडे, पक्षी आणि प्राणी धुक्याची दुलई ओढून शांतपणे निसर्गाच्या कुशीत झोपले होते आणि माझ्या सारखा एखादा चालत होता निसर्गाच्या सान्निध्यात. याच विचारात फिरत असताना झाडावर बहरणाऱ्या झाडांच्या कळ्या, फुले वसंत ऋतूच्या आगमनाची जाणिव करुन देत होती हे सर्व पाहत असताना आपसूकच मनातले शब्द ओठांवरती आले "धुंदी कळ्यांना धुंदी फूलांना"..... 


                       या गीताचे शब्द मला कॉलेज जीवनात असताना झालेल्या सांस्कृतिक संस्काराची आठवण करून देत होते. त्या काळी कविवर्य जगदीश खेबुडकर "गावरान मेवा"... हा कार्यक्रम सादर करायचे. त्यांच्या चित्रपट सृष्टीच्या अनुभवावर आधारित कार्यक्रम होता. यात ते या गाण्याचा किस्सा सांगत. हे गाणे आदरणीय बाबुजी श्री सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले आहे. श्री खेबुडकर पन्हाळ्यावर असताना बाबुजींचा त्यांना फोन आला आणि बाबुजीनी सांगितले मी एक चाल तयार केली आहे. या चालीवर गीत लिहून द्या. साधारणपणे गीत आधी लिहले जाते आणि त्यास नंतर संगीतकार चाल लावतात. इथे उलटा प्रकार होता. आधी चाल आणि नंतर गीत. बाबुजीनी फोन वरूनच त्यांना चाल 'ड' च्या भाषेत सांगितली आणि प्रत्येक शब्दात किती अक्षरे असावीत याचे बंधन घातले. 

डाडा डडाडा डाडा डडाडा

2          3        2         3.

इतक्या अटी आणि शर्ती असल्या तरी पन्हाळ्याचा रम्य परिसर आणि कवीची प्रतिभा यातून एक द्वंद गीत जन्माला आले.


धुंदी कळ्यांना, धुंदी फुलांना

2.           3.        2.      3

शब्दरूप आले मुक्या भावनांना.


तुझ्या जीवनी नीतीची जाग आली

माळरानी या प्रीतीची बाग आली

सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा


तुझा शब्द की थेंब हा अमृताचा

तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा

उगा लाजण्याचा किती हा बहाणा


चिरंजीव होई कथा मिलनाची

तृषा वाढते तृप्त या लोचनांची

युगांचे मिळावे रूप या क्षणांना


                  जुन्या द्वंद गीताचे चित्रीकरण आजच्या करोना काळातील "दो गज की दुरी"..... हा नियम कटाक्षाने पाळून होत असे.😄 दो गज अंतर बरोबर आहे का? हे मोजण्याकराता नायक अधून मधून नायिकेचा पदर धरत अंतर मोजे नाहीतर झाडाला धरून तू या झाडाला मी त्या झाडाला म्हणत योग्य अंतर राखत.


                    हा विनोदाचा भाग सोडला तर हे गीत समजण्या करता चित्रपटाची कथा समजून घेणे गरजेचे."धाकटी बहीण" या चित्रपटात वाईट मार्गास लागलेल्या नायकास सुधारण्याचे आव्हान नायिका स्वीकारते. त्यात यशस्वी होते आणि हे सर्व घडत असताना ते एकमेकांच्या प्रेमात पडतात. या गीताचे रसग्रहण करण्याइतका मी मोठा नाही पण या गीता विषयी माझ्या भावना व्यक्त करत आहे. गीतातून चित्रपटाची कथाच उलगडते.


"तुझ्या जीवनी नीतीची जाग आली

माळरानी या प्रीतीची बाग आली

सुटे आज माझ्या सुखाचा उखाणा"


                     वाम मार्गास लागलेला नायक योग्य मार्गावर येत आहे..... हे या कडव्यात 'नीती' हा शब्द वापरून सहज पणे सांगितले आहे आणि हे सर्व घडत असताना त्यांचे प्रेम फुलत आहे.. 


"प्रीतीची बाग आली "

या चपखल शब्दात व्यक्त केले आहे.


शेवटी प्रेम म्हणजे तरी काय असतं.


नजरेने नजरेला कळत ते प्रेम

स्पर्शाने जाणवते , फुलते ते प्रेम

शब्दा शब्दात व्यक्त होते ते प्रेम.

हेच भाव पुढील कडव्यात खेबुडकर यांनी दोनच ओळीत व्यक्त केले आहेत.


"तुझा शब्द की थेंब हा अमृताचा

तुझा स्पर्श की हात हा चांदण्याचा"


                       तर असे हळुवार अमृतासम प्रेम ज्यांना लाभेल ते प्रेमी आणि त्यांचं प्रेम अजरामर होणारच. म्हणून कवी शेवटच्या कडव्याची सुरवात करताना म्हणतात


*चिरंजीव होई कथा मीलनाची


असेच हे प्रत्येकाचे प्रेम  आणि प्रेम गीते निरंतर धुंद करत राहतील यात शंका नाही.


श्री जयराम भिडे


PC Google

Comments

Popular posts from this blog

तुम बिन सात दिन

नाका

पराधीन आहे जगती